चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमात गुंडांचा वावर, राष्ट्रवादीचा आरोप
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्याची सुसंस्कृत अशी ओळख पुसण्याचा काम करत आहेत असा आरोप पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. कारण मंगळवारी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उपस्थित होते. चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न झाला असल्याचा गंभीर आरोप प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला.
प्रशांत जगताप म्हणाले, सुसंस्कृत पक्ष अशी बिरुदावली मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा व या पक्षाच्या नेत्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जणू पुण्याची संस्कृती बिघडविण्याचा चंगच बांधला आहे की काय, भाजप पुण्याची संस्कृती कोणत्या दिशेने घेऊन जात आहे, हेही स्पष्ट होत आहे. कुख्यात गुंड दीपक गागडे व नाना मोघे हे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत यापूर्वी कार्यक्रमांत दिसून आले आहेत. विशेष म्हणजे तडीपार असताना चंद्रकांत पाटील यांच्यासोबत या गुंडांची उपस्थिती होती. मंगळवारीही पुन्हा याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. या घटना पाहता चंद्रकांत पाटील पुण्याची संस्कृती कोणत्या दिशेने नेऊ पाहात आहेत, शांत पुण्याला अशांत करण्याचा प्रयत्न का करीत आहेत.
भाजपकडून आगामी पुणे महानगरपालिकेची निवडणूक अशा गुंड प्रवृत्तीवरच लढवली जाणार आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पुणे शहरातील लोकप्रतिनिधी म्हणून या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज आहे.