बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (22:56 IST)

संजय राऊतांकडून चंद्रकांत पाटलांना कायदेशीर नोटीस, माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई; दिला इशारा

मागील काही दिवसांपूर्वी पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे शिवसेना नेते संजय राऊत  कुटुंबीयांना मिळाल्याचा आरोप भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस  पाठवली आहे. अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
 
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये सांगितले की, माझ्या आणि माझ्या पत्नीविरोधात बदनामीकरक, निराधार आणि बोगस टिप्पण्या केल्याबद्दल चंद्रकांतदादा पाटील यांना मी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.जर चंद्रकांत पाटील यांनी बिनशर्त माफी मागितली नाही, तर मी पुढील कायदेशीर कारवाई करेन आणि न्यायालयात जाईन, असे ट्विट संजय राऊत यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यामधील वादानंतर शिवसेनेने(Shivsena) अग्रलेख लिहीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधाला होता.त्या अग्रलेखाला प्रत्युतर देताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना पत्र पाठवलं होतं.या पत्रामध्ये तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून (PMC Bank scam) निघालेले 50 लाख रुपये मिळालेआणि या बेहिशोबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने (ED) नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता, असे पाटील यांनी पत्रात म्हटले होते.
 
चंद्रकांत पाटलांनी पत्रात काय म्हटले होते ?
तुम्ही अग्रलेख लिहिले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल.पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला ? संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा (Black money) असावा लागतो.आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले 50 लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्याने तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करुन, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात.हे सर्व पाहिल्यावर मी अंदाज बांधला की 50 लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर 127 कोटींसाठी नक्कीच फेस येणार, असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला,पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे, असे पत्रात म्हटले होते.

काय म्हणाले राऊत ?
पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटील जे काही बोललेत, त्यांनी जे आरोप केलेत ते मला मान्य नाही.आम्ही असले फालतू धंदे करीत नाही. असे घोटाळे केले असते तर मी इतक्या वर्षात राजकारणात राहिलो नसतो.पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.कारण पाटलांची लायकी कोट्यावधी रुपयांचा दावा ठोकणारा नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहे.कारण पाटलांची लायकी कोट्यावधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे, अशी टीका राऊतांनी (Sanjay Raut) केली.