तराफ्याचे इंजिन बंद, अन अजित पवार अडकले धरणाच्या मधोमध
पुण्याच्या कासारसाई धरणाच्या मधोमध पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अडकले होते. तराफ्यावर बसून मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला ते निघाले होते. तेव्हा तराफ्याचे इंजिन बंद पडले. चालकाने इंजिन सुरू करायचे प्रयत्न केले पण शेवटी लगतची बोट जवळ घेण्यात आली आणि दादा त्यात बसले मग पुढचा प्रवास सुरु झाला.
सुरुवातीलाच अजित पवारांनी जास्तीचे लोक तराफ्यात बसवू नका अशी तंबी दिली होती. मात्र तरीही उपस्थितांनी तराफ्यावर गर्दी केली आणि अधिकच्या वजनाने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला होता.
पुण्याच्या मावळ तालुक्यात कासारसाई धरण आहे. तिथं बऱ्यापैकी मत्स्यव्यवसाय सुरू आहे. त्याचीच माहिती घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सकाळी सात वाजताच पोहोचले होते. धरणाच्या मध्यभागी पिंजरा लावण्यात आलेला होता. तिथं जाण्यासाठी तराफा अथवा बोटीच्या साह्याने जायचं होतं. संबंधित मालकांनी दादांना तराफ्यावर घेऊन जायचं नियोजन आखलं होतं. गाडीतून दादा उतरताच त्यांना याची कल्पना देण्यात आली. तेव्हाच गरजेपेक्षा जास्तीचे लोक त्यावर घेऊ नका, अशी तंबी दादांनी दिली. दादा तराफ्यावर बसले पण मागून अधिकच्या काहींनी गर्दी केली.
हमी एका फटक्यात चालू होणारं इंजिन चालकाला चालू होत नव्हतं. पाच-सहा प्रयत्नांनी ते सुरू झालं, तराफा पिंजऱ्याच्या दिशेने निघाला. मधोमध तराफा जाताच तो थांबला. अधिकचे लोक तराफ्यावर असल्याने इंजिनवर ताण आला आणि ते बंद पडलं. मग पुन्हा इंजिन सुरू करण्यासाठी चालकाचे प्रयत्न सुरू झाले, मत्स्यव्यवसायाचे मालक ही झटू लागले. शेवटी शेजारच्या बोटीला जवळ बोलविण्यात आलं, दादा त्यात बसले आणि पिंजऱ्यावर पोहचले. पिंजऱ्यावर ही दादांचा चांगलाच घाम निघाला. पाहणी आणि माहिती घेऊन दादा परत निघाले तेंव्हा ते याबद्दल व्यक्त झाले. इथलं पर्यटन म्हणजे खूप कसरत घ्यावी लागते अशी मिश्किल टिपण्णी दादांनी यावर केली.