सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (08:18 IST)

विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला

माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “आज माझ्यावर अतिशय निर्घृण असा हल्ला झाला. कळमनुरी येथील कसबे धवंडा येथे हा हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. मला गंभीर इजा पोहोचवण्याचा या हल्ल्याचा प्रयत्न होता. एका महिला आमदारावर झालेला हा हल्ला एकप्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे. समोर येऊन वार करा असे भ्याडपणे मागून हल्ला करु नका” अशा शब्दात प्रज्ञा सातव यांनी या हल्ल्याचा निषेध केला.
 
आमदार प्रज्ञा सातव या आज हिंगोली दौऱ्यावर होत्या. त्यावेळी कसबे धवंडा या गावात त्या एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सातव यांनी फेसबुक पोस्ट देखील टाकली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, “माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई , इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता.”
Edited by: Ratnadeep Ranshoor