भाजप महापौर उपमाहापौर यांना लॉटरी
नाशिकच्या महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गीते यांना ३ महिने मुदत वाढ मिळाली आहे. त्यामुळे या दोघांना तीन महिन्याचा अधिक कालावधी मिळाल्यामुळे मुदतवाढीची लॉटरी लागल्याची चर्चा नाशिककरांमध्ये आहे. या आधी नाशिकचे महापौर दशरथ पाटील आणि डॉ शोभा बच्छाव यांना हि अशीच मुदतवाढ मिळाली होती.
१५ सप्टेंबर ला नाशिकच्या महापौर उपमहापौर यांच्या निवडणूका होणार होत्या परंतु विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत राज्यातील ज्या महानगरपालिकांमधील महापौर व उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे, अशा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात ३ महिने पुढे ढकलण्यासह त्यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे हि मुदत वाढ नाशिकच्या महापौर आणि उपमहापौर यांना मिळणार असून अडीच वर्षाचा कालावधीला ३ महिने मुदत वाढ मिळणार आहे.परंतु भविष्यात येणाऱ्या महापौर व उपमहापौर यांचा कालावधी ३ महिन्यांनी कमी होणार आहे.
राज्यात ऑक्टोबर-२०१९ मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणूक पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी महापौर व उप महापौरांच्या निवडणुका तात्पुरत्या ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका (राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यांच्यामुळे विवक्षित महानगरपालिकांचे महापौर व उपमहापौर पदांसाठीच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अधिनियम- २०१९ हा अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.