तुमची कर्मभूमी ना मग बॉलिवूड कोठे आहे मनसेचा संताप
सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पुढे आला आहे. स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदत दिली आहे. तर सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करतानां समोर येतो आहे. सोबतच मराठी कलाकार सुद्धा यामध्ये उतरले असून मदत पोहोचवत आहेत.
मात्र, मुंबई अन् महाराष्ट्रातून जगभर पसरणारा आणो कोट्यवधी रुपये कमावणार बॉलिवूड कुठं गेलाय ? या बॉलिवूडकरांना हे मोठे संकट दिसत नाही का? असा प्रश्न अनेकांना पडला. मनसेने याबाबत प्रश्न विचारला आहे. "समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी बघून सगळेच भारावलेत, पण... महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत? असा प्रश्न मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी विचारला आहे. तर, असो, आम्ही आमच्या मातीतल्या मायेच्या माणसांसाठी सदैव झटत राहू, असेही त्यांनी सांगितले आहे.लानत है उनपर, जिनके पास दानत नही है.... असे म्हणत मनसेनं बॉलिवूड कलाकारांना फटकारलं आहे.