गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 एप्रिल 2026 (10:35 IST)

राज्य सरकारने परवानगीशिवाय शाळांच्या नावात 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'वर्ल्ड' किंवा 'युनिव्हर्सल' असे शब्द वापरण्यावर बंदी घातली

School
राज्य सरकारने परवानगीशिवाय शाळांच्या नावात 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'वर्ल्ड' किंवा 'युनिव्हर्सल' असे शब्द वापरण्यावर बंदी घातली आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या नावांच्या संदर्भात एक अत्यंत कडक निर्णय घेतला असून, अनेक शाळांच्या मनमानी कारभाराला चाप लावला आहे. पालकांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि नावांचा गैरवापर रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

'इंटरनॅशनल' आणि 'ग्लोबल' नावांवर बंदी
अनेक शाळा राज्य मंडळाचा (SSC) अभ्यासक्रम शिकवत असतानाही शाळांच्या नावात 'इंटरनॅशनल' (International), 'ग्लोबल' (Global), 'वर्ल्ड' (World) किंवा 'युनिव्हर्सल' (Universal) अशा शब्दांचा वापर करतात. यामुळे पालकांना वाटते की ही शाळा IB किंवा केंब्रिज बोर्डाची आहे. आता अशा प्रकारे नावाचा वापर करण्यावर राज्य सरकारने पूर्णपणे बंदी घातली आहे.

कोणाला हे शब्द वापरता येतील?
फक्त त्याच शाळांना हे शब्द वापरता येतील ज्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय मंडळाची अधिकृत संलग्नता आहे.
जर शाळा केवळ राज्य मंडळाची असेल, तर त्यांना ही नावे तातडीने बदलून साधी नावे ठेवावी लागतील.
तसेच जे शिक्षण संस्था चालक आदेश देऊनही नावातील हे शब्द काढणार नाहीत, त्यांच्या शाळेची मान्यता रद्द केली जाऊ शकते. चुकीची माहिती देऊन पालकांची दिशाभूल केल्याबद्दल संबंधित संस्थांवर मोठा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सरकारचा उद्देश-
पालकांना प्रवेशावेळी नेमका बोर्ड कोणता आहे, याची स्पष्ट माहिती मिळावी.
केवळ नावात 'इंटरनॅशनल' लावून पालकांकडून जादा फी उकळण्याचे प्रकार थांबवणे.

महापालिका शाळांनाही नियम लागू
हा नियम केवळ खासगी शाळांनाच नाही, तर ज्या महापालिका शाळांच्या नावात 'इंटरनॅशनल' शब्द वापरला गेला आहे, त्यांनाही लागू होणार आहे. त्यांनाही आता 'महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ' किंवा इतर योग्य अधिकृत नावांचा वापर करावा लागेल.
Edited By- Dhanashri Naik