शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जुलै 2020 (19:03 IST)

बकरी ईदसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी व सोशल डिस्टन्सिगच्या नियमांमुळे सण उत्सवांच्या आनंदावर विरजण पडले आहे. नागरिकांना सण उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. आगामी बकरी ईद सणासाठीही राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचनांची घोषणा केली आहे. तसेच इथून पुढे व सण सुरु झाल्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना जाहीर झाल्यानंतर त्यांचेही पालन करावे, असं आवाहन सरकारनं केलं आहे.
 
१) करोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
२) सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.
३) नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
४) प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निबंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
५) बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
६) करोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
 
बकरे-खरेदी विक्रीसाठी ऑनलाइन प्रणाली
“कंटेंटमेंट झोनमध्ये कुठलेही सण साजरे करण्यास परवानगी नसेल. बकरे खरेदी-विक्रीसाठी सरकारच्या वतीनं ऑनलाइन प्रणाली स्थापित केली जाईल. कुर्बानीसाठी गर्दी करण्यास सक्त मनाई असेल. देवनार मंडीसारख्या मोठ्या मंडींना परवानगी देण्यात येणार नाही. मार्केट केवळ खुल्या मैदानातच लावले जाईल,” अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.