सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2023 (08:30 IST)

महाराष्ट्राला नवी दिल्लीत ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त

नवी दिल्ली  : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने  गौरविण्यात आले.
 
येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले.  याप्रसंगी  केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू, तसेच केंद्रीय सचिव पंकज कुमार उपस्थित होते.
 
कार्यक्रमात विविध श्रेणीत प्रथम आलेल्या राज्यांना, शहरांना, महानगर पालिकांना, नगर पालिकांना, ग्राम पंचायतींना उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित  करण्यात आले. द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे  पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
उत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार या श्रेणीमध्ये जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच दत्तु निबांळकर, माजी सरपंच भीमराव जाधव आणि खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ एस.व्ही. सोनुने यांनी स्वीकारला.  हा पुरस्कार मेघालय राज्यातील री भोई जिल्हा येथील मावकिर्देप या ग्राम पंचायती सोबत विभागून मिळालेला आहे.
 
कडेगावचा झाला असा कायापालट
कडेगाव हे खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्राच्या अंतर्गत येते. राष्ट्रीय नाविन्यपूर्ण हवामान लवचिक कृषी कार्यक्रम  (NICRA- National Innovative Climate Resilient Agriculture program) प्रकल्पा अंतर्गत 2015-16 मध्ये कडेगावाला दत्तक घेण्यात आले. या गावात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनानुसार विविध हवामान अनुकूल उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यापैकी नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन या घटका अंतर्गत गावात  सिमेंट नाल्याचे बांधकाम, बांधामधील गाळ काढणे, पाझर तलावातील गाळ काढणे, भूमिगत प्लास्टिक बंधारा बांधणे, कृत्रिम विहीर पुनर्भरण करणे, शेततळयातील गाळ काढणे, वाळूच्या गोण्या दाबून चेकडॅम बनविणे, भूमिगत प्लास्टिक बंधारे बांधणे असे उपक्रम हाती घेण्यात आले.

 यासह कमी पाण्यावर येणारी पिके जसे तुती (रेशीम उद्योग), गव्हाऐवजी कमी पाण्यावर येणारी ज्वारी, हरभरा या पिकांना प्रोत्साहन देण्यात आले. कापूस आणि  मूग, सोयाबीन आणि तूर अशा आंतरपीक पद्धतींना प्रोत्साहन देण्यात आले.  सोयाबीन आणि हरभरा पिकांसाठी बीबीएफचा वापर करण्यात आला. कापूस पिकात ठिंबक सिंचनाचा वापर करण्यात आला. पाणलोट क्षेत्र आधारित उपक्रम – नवीन शेततळी, शेतीचे यांत्रिकीकरण याशिवाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता वाढविण्यात आल्या. या सर्व उपाय योजनांमुळे गावातील पाणी टंचाईवर पुर्णपूणे मात करण्यात आली. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे कडेगावाची मोहर राष्ट्रीय पातळीवर उमटली.
 
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील मलकापूर या नगर परिषदेस उत्कृष्ट नागरी स्थान‍िक संस्था या श्रेणीत तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आज केंद्रीय मंत्री श्री शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नगराध्यक्ष निलम येडगे आणि उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा जलनिस्सारण व आरोग्य सभापती  मनोहर शिंदे यांनी स्वीकारला. हा पुरस्कार सुरत महानगर पालिकेसह विभागून देण्यात आला.
 
मलकापूर नगर परिषदेतील 24X7 नळ पाणी पुरवठा ठरला पथदर्शी प्रकल्प
 
मलकापूर नगरपरिषदेने वर्ष 2009 पासून 24X7 नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती. सलग 15 वर्षे अखंडितपणे हि योजना सुरु आहे. यामुळे मलकापूर शहरातील नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो. 24X7 नळ पाणी पुरवठा योजनेस वर्ष 2011 चा नॅशनल अर्बन वॉटर ॲवार्ड व पंतप्रधान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
 
ही योजना देशभरातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरली आहे. 24 तास पाणी मीटरव्दारे देण्यात येते. यामध्ये जे स्थान‍िक नागरीक दर महिण्याच्या 15 तारखेच्या आत पाणी पट्टी कर भरतात त्यांना 10 टक्के सवलत दिली जात असल्याने 90 टक्के लोग पाणी पट्टी कर भरतात, अशी माहिती उपनगराध्यक्ष श्री शिंदे यांनी दिली.
 
24X7 नळ पाणी पुरवठा योजनेसाठी कोयना नदीच्या पात्रातून जॅकवेल मधून रॉ-वॉटर घेऊन त्याच्यावर 24X7 फिल्टर प्लांटद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाने प्रक्रिया केली जाते. डी आय व एचडीपीई बंद नलिकेद्वारे एएमआर मीटरचा वापर करुन संपुर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो.
 
मलकापूर नगरपरिषद 24X7 नळ पाणी पुरवठा योजने बरोबरच मलकापूर नगरपरिषदेने सांडपाणी प्रक्रिया योजना राबविली आहे. या अंतर्गत पाण्याचा पुर्नवापर अतिशय नियोजनबद्दरित्या केला जात आहे. हे पुर्नवापर केलेले पाणी शेतीसाठी वापरण्यात येत आहे.मलकापूर नगर परिषदेच्या  एकूण कार्याचा गौरव आज राजधानी दिल्लीत करण्यात आला.
 
स्वयंसेवी सामाजिक संस्था या श्रेणीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुणे येथील ‘भारतीय जैन संघटनेस’ (बीजेएस) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे प्रमुख शांतीलाल मुथा आणि सहायक संचालक स्वप्ना पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बीजेएस ही संस्था मागील 37 वर्षांपासून जलस्त्रोत विकास, मुल्य आधारित शालेय शिक्षण, आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापन या विषयांवर अविरत काम करीत आहे. 2013 पासून जल संधारणावर सातत्याने  संस्थेचे कार्य सुरू आहे. महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन, जलाशयांचे व तलावांचे पुनरुज्जीवन, त्यातून निघणारी माती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे नापीक झालेली जमीन सुपीक होत आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी साधारण ६५% खर्च हा गाळ शेतात नेऊन टाकण्याचा असतो तो शेतकरी स्वत: उचलतात, हे विशेष. राज्यातील बुलढाणा जिल्ह्याला जलपर्याप्त करण्याचे महत्त्वाचे नियोजन कार्य बीजेएस संस्थेच्या माध्यमातून झालेले आहे. आता संस्था राज्य सरकारची ‘गाळ-मुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबवण्यात सरकारी यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करत आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor