मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 19 एप्रिल 2022 (08:17 IST)

महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख; सलग दुसऱ्यांदा मराठी व्यक्ती लष्कर प्रमुख पदी

manoj pande
केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज पांडे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख महाराष्ट्राचेच सुपुत्र जनरल मनोज मुकुंद नरवणे सेवानिवृत्त होत असून ले.जनरल मनोज पांडे हे ३० एप्रिल २०२२ रोजी त्यांचा पदभार स्विकारतील.
 
केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने सेवा ज्येष्ठतेनुसार ले.जनरल पांडे यांची देशाचे आगामी लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. मुळचे नागपूरचे असलेले ले.जनरल पांडे यांच्या निवडीमुळे ले.जनरल नरवणे यांच्यानंतर देशाच्या लष्कर प्रमुखपदी ले.जनरल मनोज पांडे यांच्या रुपाने महाराष्ट्राचे सुपुत्र सलग दुसऱ्यांदा हे पद भूषविणार आहेत.ले.जनरल मनोज पांडे यांनी 1 फेब्रुवारी २०२२ रोजी लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. तसेच, यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला त्यांना उल्लेखनीय योगदानासाठी ‘परम विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.
 
ले.ज. मनोज पांडे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहे. यापदावरील ते तिसरे मराठी अधिकारी असतील. यापूर्वी जनरल अरूण कुमार वैद्य या मराठी अधिकाऱ्याला 1983 ते 1986 या कालावधीत देशाच्या लष्कर प्रमुखपदाचा बहुमान मिळाला आहे. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 31 डिसेंबर २०१९ रोजी या पदाची सुत्रे स्वीकारली होती.
 
ले. ज. मनोज पांडे हे पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून, डिसेंबर 1982 मध्ये कोअर ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये ते नियुक्त झाले. जनरल ऑफिसर म्हणून त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील पल्लनवाला क्षेत्रात ऑपरेशन पराक्रम दरम्यान इंजिनीअर रेजिमेंटचे नेतृत्व केलेले आहे. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बरली (युनायटेड किंगडम)चे पदवीधर आहेत. त्यांनी हायर कमांड (एचसी) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (एनडीसी) अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतलेले आहे.
 
लष्करातील 39 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी विविध महत्वाच्या पदांची यशस्वीपणे जबादारी सांभाळली आहे. यात वेस्टर्न थिएटरमधील स्ट्राइक कोरच्या इंजिनिअर ब्रिगेडचे कमांड, पश्चिम लद्दाखच्या उंचावरील माउंटन विभाग, ईशान्येतील कॉअर, अंदमान आणि निकोबार कमांडचे (CINCAN) कमांडर-इन-चीफ आणि पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ तसेच दक्षिण कमांडचे चीफ-ऑफ-स्टाफ आदी महत्वपूर्ण जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.
 
ले. ज. पांडे यांच्या लष्कारातील उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना अती विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक तसेच, लष्करप्रमुखांकडून आणि जीओसी-इन-सी ( GOC-in-C) कडून उत्तम कामगिरीसाठी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.