महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भरती प्रक्रिया : लेखी परीक्षेचा निकाल जाहिर; येथे पहा
नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील शिक्षकेतर पदांकरीता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला आहे. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या आस्थापनेवर रिक्त शिक्षकेतर पदांकरीता नुकत्याच घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असून तो विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ
www.muhs.ac.in वर सर्वांना पहाता येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ठ उमेदवारांना गुण पडताळणी करणेसाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे तद्नंतर पदनिहाय व संवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील जाहिरात क्र. 09/2022 नुसार रिक्त शिक्षकेतर पदांकरीता दि. 14 ते 18 ऑक्टोबर 2022 कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात आली. राज्यातील एकूण 28 परीक्षाकेंद्रांवर एकूण 14080 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली आहे. यामध्ये कक्ष अधिकारी, कक्ष अधिकारी (खरेदी), अधीक्षक, वरिष्ठ लिपिक कम डेटा इंट्री ऑपरेटर, वरिष्ठ सहायक, लिपिक कम टंकलेखक, डेटा एंट्री ऑपरेटर, निम्मश्रेणी व उच्चश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, रोखपाल, भांडारपाल, सहायक लेखापाल, वीजतंत्री, छायाचित्रकार, आर्टिस्ट कम ऑडिओ अॅण्ड व्हिडीओ एक्सपर्ट, सांख्यिकी सहायक, वाहन चालक, शिपाई आदी संवर्गासाठी परीक्षा घेण्यात आली होती. उमेदवारांनी लेखी परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरच पहावा. निकाला संदर्भात खोटा संदेश व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे विद्यापीठाकडून सूचित करण्यात येत आहे.
Edited by- Ratnadeep Ranshoor