शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017 (11:44 IST)

अमेरिकेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची आणि पंकजा मुंडे यांची भेट

‘लेजिस्लेटीव्ह फेलोज प्रोग्राम’ अंतर्गत अमेरिकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात भेट घेऊन महाराष्ट्र विधान मंडळाबाबत माहिती जाणून घेतली.

शिष्टमंडळात श्रीलंकेचे माजी खासदार श्रीरंगा जयरतनाम, अमेरिकेच्या लॉ लायब्ररी ऑफ काँग्रेसचे परकीय कायदे विशेषज्ञ तारिक अहमद, गॉर्डन स्क्वेअर आर्टस् डिस्ट्रीक्ट, क्लिव्हलॅण्ड (ओहियो राज्य) च्या अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक कॅरी कारपेन्टर यांच्यासह अमेरिकेच्या चार राज्यांमधून आलेल्या अलेसिया चॅटमन रॅट्लीफ, एलीझाबेथ हॅविस्टो, टिमोझी लॉवेल, रॅण्डॉल मेयर, केव्हीन सर्व्हिक, ॲडम हॅरेल, सीझर ऑगस्टो वेन्सी, लॉरा रॉस-व्हाईट आणि ‘लेजिस्लेटीव्ह फेलोज प्रोग्राम’ चे समन्वयक जितेंद्र देहाडे यांचा समावेश होता.

शिष्टमंडळाने घेतली मंत्री पंकजा मुंडे यांची भेट

शालेय मुलींच्या आरोग्य रक्षणासाठी पाच रुपयात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राज्य शासन सुरु करत असलेल्या अस्मिता योजनेचे अमेरिकेच्या शिष्टमंडळाने आज येथे कौतूक केले. वर्ल्ड लर्निंग संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमांतर्गत अमेरिकेच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात ग्रामविकास आणि महिला - बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यावेळी शासनामार्फत महिला आणि बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. सॅनिटरी पॅडची उपलब्धता सुलभरित्या होण्यासाठी महाराष्ट्र शासन सुरु करत असलेली अस्मिता योजना कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया शिष्टमंडळातील सदस्यांनी यावेळी दिली.