महाविकास आघाडीत कोणत्याही कुरबुरी नाहीत : संजय राउत
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सर्व निर्णय सहमतीने होतात. महाविकास आघाडीत कोणत्याही कुरबुरी नाहीत. अंतर्विरोध, मतभेद हे शब्द महाविकास आघाडीच्या डिक्शनरीत नाहीत. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल” असा दावा शिवसेनेचा खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केला. अंतर्विरोधाचा अंतरपाटही आमच्यामध्ये नाही असे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले.
महाविकास आघाडीचं सरकार हे तीन प्रमुख पक्षांनी मिळून बनवलेलं सरकार आहे. हे खिचडी सरकार नाही असं राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हे सरकार पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल हा विश्वास शरद पवारांनीच व्यक्त केला आहे, असे राऊत म्हणाले. मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “अधिकाऱ्यांच्या बदल्यावरुन कोणी राजकारण करु नये. बदल्यांचा विषय मोठा नाहीय. हा विषय आमच्याकडून थांबलाय या विषयाला फार महत्त्व देऊ नये.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यकारभाराकडे अत्यंत डोळसपणे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.