बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (15:32 IST)

मनोहर पर्रीकर यांच्या मुलाची बंडखोरीची तयारी

माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मुलाने बंडखोरीची तयारी केली आहे . मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी गोव्याची राजधानी पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.  भाजपने उत्पल यांना तिकीट न दिल्यास ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतात.
 
उत्पल यांनी त्यांचे वडील मनोहर पर्रीकर यांची जागा असलेल्या पणजीतही घरोघरी प्रचार सुरू केलाय. 2019 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपने या जागेवरून सिद्धार्थ श्रीपाद कुंकळणीकर यांना तिकीट दिले होते. मात्र, त्या निवडणुकीत काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात विजयी झाले आणि त्यांनी ही जागा भाजपकडून हिसकावून घेतली. मात्र, 2019 मध्ये बाबूश यांच्यासह काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये सामील झाले. बाबूश यांच्या पत्नी जेनिफर यांना सरकारमध्ये महसूल खात्याचा महत्त्वाचा पदभार देण्यात आला. बाबूश ही जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे, तर उत्पल यांना येथून निवडणूक लढवायची आहे.
 
मात्र ही जागा बाबूश यांच्याकडून उत्पल यांना दिल्यास गोव्यात पक्ष अडचणीत येण्याची भीती भाजपला आहे. खरे तर बाबूश हे पणजीचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी तळेगावच्या आमदार आहेत. त्यांचा मुलगा पणजीचा महापौर आहे. बाबूश यांचा प्रभाव आजूबाजूच्या 5-6 विधानसभा जागांवर आहे. उत्पल यांनी यावेळी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.