शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (20:58 IST)

आगामी लोकसभेसाठी 4-1-1 असा मविआचा फॉर्म्युला?

uddhav
मुंबई : पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्यातही आगामी लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांच्या महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. पण, येत्या काळात जागावाटपावरून मविआमध्येही जुंपण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच महाविकास आघाडीत असलेला ठाकरे गट मुंबईतील सहापैकी चार जागांवर आग्रही असल्याची माहिती मिळत आहे.
 
मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागांवर ठाकरे गट आग्रही असल्याचे दिसत आहे. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा असून त्या सहा जागांसाठी महाविकास आघाडीचा 4-1-1 असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. मुंबईतील लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठक ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे घेत आहेत. अशातच मुंबईतील सहा जागांपैकी चार जागांवर ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे.
 
मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार लोकसभांच्या जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती आहे. यामध्ये दक्षिण मुंबईसाठी विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेसाठी अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. तर ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे गटाची चाचपणी सुरू असून या दोन जागांसाठीचा उमेदवार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही.


Edited By - Ratnadeep Ranshoor