1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 डिसेंबर 2021 (10:11 IST)

'म्हाडा'ची भरती परीक्षा अचानक पुढे ढकलली, आव्हाडांनी मागितली विद्यार्थ्यांची माफी

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी आज (12 डिसेंबर) परीक्षा नियोजित होती. मात्र, ही परीक्षा 'अपरिहार्य कारणामुळे' पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरद्वारे दिली.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर-फेसबुकवर रात्री 1.54 वाजता व्हीडिओ शेअर करत सांगितलं की, "सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून, काही अपरिहार्य कारणामुळे, तांत्रिक अडचणीमुळे उद्याची (12 डिसेंबर) होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा या जानेवारीत घेतल्या जातील. त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत."
आव्हाड पुढे म्हणाले, "ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की, विद्यार्थ्यांनी सकाळी घराबाहेर पडून सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, त्यांनी गाव सोडू नये. परत एकदा आपली क्षमा मागतो."
परीक्षा अचानक रद्द केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. यापूर्वी आरोग्य भरतीच्या परीक्षेवेळीही असाच अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळातूनही या प्रकारावर टीका होतेय.
जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती देणारा व्हीडिओ ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर त्याखाली बऱ्याच प्रतिक्रिया आल्यात. त्यात काही विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय, तर काही विद्यार्थ्यांनी हतबलता व्यक्त केलीय.