ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये मिसमॅनजमेंट ः खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
छगन भुजबळ यांच्यासह आम्ही अनेक वर्षे काम केले आहे. मी जे सांगणार आहे त्याबद्दल गैरसमज करुन घेऊ नका. मात्र मला छगन भुजबळ यांना इतकी विनंती करायची आहे की, ज्या मागण्या तुम्ही व्यासपीठावर करत आहात त्या मागण्या जर बंद दरवाजाच्या आड केल्या तर बरं होईल कारण तो त्यांचा अधिकार आहे.छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे तो अधिकार आहे. महाराष्ट्राच्या दुर्दैवी आणि गलिच्छ राजकारणात जो गोंधळ सुरु आहे त्यात छगन भुजबळ यांना मंत्रीपद आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळात ते जर बोलले तर बरं होईल. खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
या महायुतीच्या सरकारकडे २०० आमदार आहेत, तरीही तुमच्या कॅबिनेट मंत्र्याला बाहेरचे व्यासपीठ लागत असेल तर संजय राऊत जे म्हणतात तसे कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरु आहे का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला.नाशिकचे लोक आत्ताच मला भेटले. तिथल्या ड्रग माफियाची चर्चा सातत्याने होते आहे. सत्तेत असलेले लोक कॅबिनेटचे विषय सभांमध्ये मांडत आहेत. यातच या ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये किती मिसमॅनजमेंट आणि धोरण लकवा आहे हे समजते आहे. कॅबिनेट मंत्री बाहेर येऊन बोलत असतील तर मग कॅबिनेटमध्ये काय होते? महाराष्ट्राचे नुकसान हे ट्रिपल इंजिन खोके स्वार्थी सरकारमुळे होत आहे.
नक्की सरकारची भूमिका काय आहे? ते कळले पाहिजे. महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत तसंच उपमुख्यमंत्री क्रमांक १ आणि दोन यांना विचारले पाहिजे. आमचे पहिल्यापासून मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठा, लिंगायत, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या मागे ताकदीने उभा आहे. आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही भ्रष्ट पार्टीसारखे नाही. महाराष्ट्रात दुष्काळ, अतिवृष्टी यांची जबाबदारी कोण घेणार? महागाई वाढते आहे त्याला जबाबदार कोण? या सरकारमधली भांडणं संपतील तरच राज्य पुढे जाईल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. या सरकारला पैशांची आणि सत्तेची मस्ती आली आहे,ती मस्ती जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.