गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिर्डीत दहा महिन्यात ११ महिला व १४ पुरुष बेपत्ता

नगर - शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन अवघ्या दहा महिन्यात ११ महिला व १४ पुरुष बेपत्ता झाले असल्याची माहिती उघड झाली आहे. शिर्डीतुन हरविलेल्या व्यक्तींच्या माहिती अधिकारात सदर बाब उघड झाली आहे. दरम्यान इंदौर येथील साईभक्त मनोजकुमार सोनी यांची पत्नी गेल्या आठ महिन्यापासुन शिर्डीतुन बेपत्ता झाली असुन पत्नीच्या शोधासाठी दाहीदिशा फिरुनही त्यांच्या हाती काही लागले नाही.
 
इंदौर येथील मनोजकुमार सोनी याची पत्नी दिप्ती सोनी(वय ३५) परिचारीका शिर्डीत साईसमाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दि.१० ऑगस्ट २०१७ रोजी साईबाबा संस्थानच्या प्रसादालया समोरुन दिप्ती सोनी अचानक बेपत्ता झाल्या आहे. याबाबत पती मनोजकुमार यांनी शिर्डी पोलीसांत मिसींगची तक्रार नोंदवली आहे. 
 
तसेच मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील विविध शहरात शोध घेतला मात्र त्यांची पत्नी मिळुन आली नाही. आयुष्यात कमवलेली सर्व जमापुंजी शोधण्यासाठी खर्च झाली मात्र पत्नीचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रत्येक महिन्याला शिर्डीत येऊन शिर्डी पोलीस ठाण्यात याबाबत वारंवार भेट दिली. मात्र त्यांना असमाधानकारक उत्तरे मिळाल्याचे सोनी यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला मनोजकुमार सोनी यांनी माहितीच्या अधिकारात १ जानेवारी २०१७ ते १० आँक्टोबर २०१७ पर्यत किती महिला पुरुष, मुले, मुली बेपत्ता झाले किंवा पळवुन नेले याची माहिती संदर्भात अर्ज केला होता. त्यानुसार यात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात मिसीग व हरविलेल्या व्यक्तींबाबत दिलेल्या माहितीत ३० स्त्रीया हरविल्या होत्या त्यापैकी १९ सापडल्या. ३५ पुरुष हरविले होते पैकी २१ मिळुन आले आहेत. 
 
अदयाप १४ जण गायब आहेत. चार मुले हरविले होते ते सर्व सापडले आहे. चार मुली हरविल्या होत्या त्या सर्व सापडल्या आहेत. शिर्डी हे जागतिक किर्तीचे देवस्थान असुन या शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविणे गरजेचे असताना अदयाप महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविलेले नसल्याने साईंची शिर्डी रामभरोसे असल्याचे साईभक्त मनोजकुमार यांनी म्हटले आहे.