आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला दिले असे प्रत्युत्तर
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी आयकर विभागाच्या कारवाईला दिल्लीचं आक्रमण म्हटलं. त्यालाच आता भाजपचे आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. भाजप आमदार नितेश राणेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही. मुंबईच्या विविध ठिकाणी ज्या आयटीच्या रेड झाल्या. शेवटी तो त्यांच्या तपासाचा भाग आहे. पण जो राहुल कनाल नावाचा हा जो व्यक्ती आहे, ज्याचे वडील दाताचे डॉक्टर आहेत. मग त्यांच्या घरी रेड का टाकण्यात आली. राहुल कनाल भाईजान नावाचं एक हुक्का पार्लर चालवतो. मुंबईत एकाच जागी हुक्का पार्लर चालतो, तोसुद्धा हर्बल हुक्का पार्लर आहे, तो राहुल कनालचा आहे, असा भाजप आमदार आरोपही नितेश राणेंनी केलाय.
कॅफे बांद्रा नावाचं एक रेस्टॉरंट तो बांद्रामध्ये चालवतो. तिकडे सगळं अनियमित पद्धतीनं स्ट्रक्चर आहे. कोविड सेंटरसंदर्भात किंवा अन्य विविध जे टेंडर निघाले, त्याच्या मध्येही याचा कुठे ना कुठे हस्तक्षेप आहे. याहीबद्दल खूप लोकांना संशय आहे. मुंबईत चालणाऱ्या नाईटलाईफ गँगचा हा एक सदस्य आहे. राहुल कनालवर रेड का पडली, तो कोणाचा निकटवर्तीय आहे. संध्याकाळी 7 नंतर तो कोणासोबत उठतो, बसतो. कोणाच्या नाईटलाईफ गँगचा सदस्य आहे. त्याच्यावर एवढी कृपादृष्टी का आहे. त्याला थेट शिर्डी संस्थानवर ट्रस्टी म्हणून पाठवलं, असंही नितेश राणेंनी सांगितलंय.