शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 एप्रिल 2021 (16:04 IST)

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी

अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध होत नसलेल्‍या आरोग्‍य सुविधांसह बेडचे गांभिर्य लक्षात घेवून शिर्डी येथे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्‍वेमंत्री पियुष गोयल यांच्‍याकडे केली आहे.
 
या संदर्भात आ.विखे पाटील यांनी गोयल यांना विलगीकरण बोगीची मागणी करणारे सविस्‍तर पत्र दिले असून, यामध्‍ये शिर्डीसह नगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड संकटाची परिस्थिती बिकट बनली असून,शिर्डी संस्‍थानसह सर्व सरकारी रुग्‍णालये, खासगी दवाखान्‍यांमध्‍ये रुग्‍णांवर उपचार करण्‍यासाठी बेडची व्‍यवस्‍था केली असली तरी, ती अपुरी पडत आहे.
 
कोव्‍हीडचे संक्रमण दिवसागणीक वाढत चालल्‍याने उपलब्‍ध बेडची संख्‍याही आता रुग्‍णालयांमध्‍ये कमी पडू लागल्‍याचे वास्‍तव यापुर्वीच राज्‍य सरकार आणि जिल्‍हा प्रशासनाच्‍या निदर्शनास आणून दिले असल्‍याचे आ.विखे पाटील पत्रात नमुद केले. आपल्‍या विभागामार्फत देशपातळीवर रेल्‍वे बोगीच्‍या माध्‍यमातून विलगीकरण बेडची व्‍यवस्‍था करण्‍यात आली.
 
कोव्‍हीड रुग्‍णांसाठी बेडची उपलब्‍धता करुन देण्‍याचा आपल्‍या संकल्‍पनेतील उपक्रम देशपातळीवर अतिशय यशस्‍वी झाला आहे. याचा कोव्‍हीड संकटात रुग्‍णांना फायदाही झाला.विलीगीकरण बोगीची उपलब्‍धता शिर्डी आणि नगर जिल्‍ह्याकरीता झाल्‍यास त्‍याची मोठी मदत या कठीन परिस्थितीमध्‍ये होवू शकते याकडे मंत्री गोयल यांचे आ.विखे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
 
सद्य परिस्थितीत शिर्डी येथील श्री.साईबाबा मंदिर बंदच असल्‍याने भाविक येणेही पुर्णपणे थांबले आहे. त्‍यामुळे रेल्‍वे सुविधा ही बंद आहेत.आपण विलगीकरण बोगीची परवानगी दिल्‍यास शिर्डी रेल्‍वे स्‍थानकावर व्‍यवस्‍थाही चांगली होवू शकते ही बाब आ.विखे पाटील यांनी मंत्री पियुष गोयल यांच्‍या निदर्शनास आणून देत नगर जिल्‍ह्याकरीता तातडीने विलगीकरण बोगी बेडची उपलब्‍धता करुन देण्‍यास सहकार्य करण्‍याची विनंती पत्राव्‍दारे केली आहे.