सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2022 (21:23 IST)

मान्सूनची मुंबईसह महाराष्ट्रात वर्दी

monsoon
मान्सून मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी दाखल झाला आहे.
पुढील 48 तासात कोकणातल्या उर्वरित भागात आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. कोकणातील काही भागात आणि दक्षिणमध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक वेधशाळेने दिला आहे.
 
गेले काही दिवस तीव्र उष्णतेच्या लाटांमुळे राज्यातले नागरिक हैराण झाले होते. पावसाच्या आगमनामुळे त्यांना दिलास मिळण्याची शक्यता आहे.
 
अरबी समुद्रातून 29 मेला केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर मान्सूनची कर्नाटकपर्यंतची प्रगती जोरात झाली होती. बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ तयार झाल्याने मान्सूनला हा प्रवास करता आला होता. मात्र, त्यानंतर मान्सून पुढे सरकला नव्हता
 
अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग मंदावला असल्याने गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा प्रवास थांबला होता.
 
देशातल्या अन्य भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, सिक्कीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
दरम्यान शुक्रवारी रात्री राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालांचं थरारनाट्य सुरू असताना मुंबईत पावसाचं आगमन झालं. पहिल्या पावसाचा आनंद लुटलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर फोटो, व्हीडिओ, रील्सच्या माध्यमातून हा आनंद शेअर केला.
 
उन्हाने काहिली काहिली होत असताना पावसाने वर्दी दिल्याने मुंबईकर सुखावले आहेत.
 
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील लोढा पॅराडाईज, माजिवडा परिसरात झाड उन्मळून पडले. झाडा शेजारी उभ्या असलेल्या टेम्पो वाहनावर पडले. सुदैवाने यात कोणतीही दुखापत झाली नाही.
 
मुंबई, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सांगली या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पाऊस झाला.
 
आज सकाळीही मुंबई शहरातील काही भागात पाऊस झाला. वडाळा परिसरातील रस्त्यांवरही हलकं पाणी साचलं होतं. मात्र, शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यांवर कमी वर्दळ होती.
 
अवघ्या ४० मिनिटांच्या पावसाने भांडूपमध्येही पाणी साचलं होतं. ठाणे, नवी मुंबईतही मुसळधार पावसाने हजेरी लावली. गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री नवी मुंबईच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला.
 
मुसळधार पाऊस आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे बाणेरमध्ये पाणी साचलं होतं.