शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (17:25 IST)

गर्भवती पत्नीसोबत राक्षसी कृत्य, जन्माआधीच बाळ गमावलं

कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी येथे एक अमानुष घटना समोर आली ज्यात एका पतीने आपल्या गर्भवती पत्नीला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत पीडित महिलेचा गर्भपात झाला आहे. तिने जन्माआधीच आपलं बाळ गमावलं आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 
 
यासीन मन्सूर नदाफ वय 26 वर्षीय असं आरोपीचं नाव आहे. आरोपी यासीन इचलकरंजी येथील आसरानगर परिसरातील रहिवासी असून त्याने आपल्या गर्भवती पत्नीसोबत राक्षसी कृत्य केले. माहितीनुसार दोघांमध्ये 2017 पासून कौटुंबीक वाद सुरू आहे. तर गेल्या काही काळापासून आरोपी पीडित महिलेच्या आईला आणि भावाला ठार मारण्याची धमकी देत होता. तसेच पत्नीला कोणत्याही नातेवाईकांकडे जाण्यास मज्जाव करत होता.
 
22 डिसेंबर रोजी घरगुती कारणातून दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी यासीनने पीडित महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नराधम आरोपीने कंबरेच्या पट्ट्याने गर्भवती पत्नीला बेदम मारहाण केली आहे. याने पीडितेच्या पोटात दुखापत होऊन तिचा गर्भपात झाला.
 
पीडितेने आरोप केला आहे की आरोपीनं यापूर्वी देखील माहेरहून पैसे आणि दागिने घेऊन येण्यासाठी अनेकदा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. पीडित महिलेनं गावभाग पोलीस ठाण्यात पतीविरोधात फिर्याद दाखल केली असून पोलिस आता पुढील तपास करत आहे.