शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (21:34 IST)

तीन दिवसांत ठाण्यात नव्या तब्बल २०० हून अधिक खड्ड्यांची भर पडली

potoles
तीन दिवसांत ठाणे शहरात नव्या तब्बल २०० हून अधिक खड्ड्यांची भर पडल्याने एकूण खड्ड्यांचा आकडा आता १ हजार ४४८ वर पोहोचला आहे. त्यातील १ हजार ३१० खड्डे भरले असा दावा प्रशासन करत आहे. तर मुंब्रा ही प्रभाग समिती सोडली तर इतर प्रभाग समिती कुठे शंभर, कुठे दोनशे तर कुठे चारशेहून अधिक खड्डे पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 
 
पावसाळ्यापूर्वीच ठाणे महापालिकेने एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणाची बैठक घेऊन त्यांच्या मालकीच्या रस्त्यावरील खड्डे आपआपले बुजवावे अशा सुचना दिल्या होत्या. त्यानंतरही ठामपा हद्दीत देखील शहराच्या विविध भागात खड्डे पडल्याची बाब समोर आली आहे. त्यातही इतर प्राधिकरणाबरोबर महापालिका हद्दीत देखील खड्ड्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र मागील काही दिवसात दिसून आले आहे. मागील आठवड्यात १२०० च्या आसपास खड्डे पालिका हद्दीत होते. त्यात आता अवघ्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे ही संख्या १ हजार ४४८ एवढी झाली असल्याचे दिसून आले आहे. त्यातही पालिकेच्या नव्या चकचकीत आणि गुळगुळीत उड्डाणपुलांवर देखील खड्डे असल्याचे चित्र दिसत आहे.
 
 कोरम मॉल, विवियाना मॉल आदी सेवा रस्त्यांवरील डांबर अक्षरश: उडून गेल्याचे दिसत आहे. त्यातही शहरातील बहुतेक भागात वाहनांचा वेग कमी ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरवरील डांबर वाहून गेले आहे. तर काही स्पीड ब्रेकवर देखील खड्डे पडल्याचे चित्र दिसत असून दुचाकी स्वारांना येथून मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पाऊस आला धावून रस्त्याची डांबर गेली वाहून असेच म्हणावे लागले.
प्रभाग समिती –  पडलेले खड्डे – बुजविलेले खड्डे – शिल्लक खड्डे
दिवा –  ४१७  – ४०३  – १४
वर्तकनगर  – २०२   – १८९ – १३
उथळसर – ११४   – १०४  – १०
नौपाडा कोपरी –१०६   – ९८ – ८
वागळे – ११०   – ९९ – ११
कळवा – २२१  – २०४  – १३
मुंब्रा – ६०   – ३९ – २१
माजीवडा मानपाडा- १०१    – ७७ –२४
लोकमान्य सावरकर-  ११७ – ९३ – २४
—————————————————
एकूण – १४४८ – १३१०  – १३८