गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (08:46 IST)

खासदार अमोल कोल्हे एकांतवासात; घेतलेल्या निर्णयांचा विचार, कदाचित फेरविचार करणार

अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे काही दिवसांसाठी एकांतवासात जाणार आहेत. त्याबाबतची पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली असून त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आल्याचं पहायला मिळत आहे.
 
शिरूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करून लोकसभेत पोहोचलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत. विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी आणि अमोल कोल्हे यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर कोल्हे हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते होते.
 
तत्पुर्वी अमोल कोल्हे हे शिवसेनेत होते. त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ते राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यानंतर ते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्याचा पराभव करून लोकसभेत पोहोचले.कोल्हे हे अभिनेते असून त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.त्यांना या भूमिकांनी ओळख मिळवून दिली. सध्या कोल्हे हे खासदार असले तरी काही मालिका आणि जाहिरातींमध्ये काम करत होते.
 
पाहूया नेमकी ती काय पोस्ट आहे?
नुकतीच त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली असून त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यांनी लिहिले आहे.
सिंहावलोकनाची वेळ :- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय…

थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय…काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने! फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही!’
 
कोल्हे यांनी घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार करण्याबाबत सूतोवाच केले आहेत. त्यामुळे ते राजकारणाबाबत विचार करणार की, अभिनयाबाबत याची उत्सुकता लागली आहे.