शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (13:47 IST)

एमपीएससीची परीक्षा देत आहात, मग वाचा 'ही' महत्वाची बातमी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा (एमपीएससी) आता खुल्या गटातील उमेदवारास फक्त सहा वेळा परिक्षा देता येणार देता येणार आहे.  अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांना संधीची मर्यादा राहणार नाही. तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुलांना फक्त ९ वेळा संधी मिळणार आहे. याबाबतचे प्रसिध्दी पत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी प्रसिध्द केले आहे. २०२१ मध्ये प्रसिद्ध होणार्‍या एमपीएससीच्या जाहिरातीपासून हा नवा नियम लागू होणार आहे.
 
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय पदासाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारशी संदर्भात राबविण्यात येणाऱ्या निवडप्रक्रियेत वेळोवेळी करावयाच्या सुधारणात्मक उपाययोजना पैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्या उमेदवाराचे प्रयत्न किंवा संधीची संख्या मर्यादित करणे हे आहे. याबाबत आयोगाने एक निर्णय घेतला आहे.
 
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांस कमाल सहा संधी उपलब्ध राहतील. अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांस मात्र कमाल संधीची कोणतीही मर्यादा लागू राहणार नाही. उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारास कमाल ९ संधी उपलब्ध राहतील.
 
उमेदवारांच्या संधीची संख्या पुढीलप्रमाणे लागू राहतील. जर उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परिक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल तर त्याच्यासाठी ती संधी समजली जाईल.
 
उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाली तरी त्याची परिक्षेस उपस्थिती ही संधी गणली जाईल.