आयोगाने स्पष्ट केली भूमिका MPSCची परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार की नाही, वाचा
परीक्षा होणार की नाही याबाबत चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपली भूमिका जाहीर केलेली आहे. ठरलेल्या तारखेला म्हणजे 11 ऑक्टोबरलाच पूर्व परीक्षा होणार असल्याचं आयोगाने जाहीर केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसारच ही परीक्षा होणार असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. परीक्षा आणि भरती दोन्ही शासनाच्या निर्णयानुसार होणार आहेत असंही आयोगाने स्पष्ट केलेलं आहे.
काही मराठा संघटनांनी MPSCच्या परीक्षांना विरोध केला होता. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा तुटत नाही तोपर्यंत परीक्षा स्थगित ठेवण्याची मागणी काही मराठा संघटनांनी केलेली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेऊन त्याचा निकाल हा मराठा आरक्षणाची स्थगिती उठल्यानंतर निकाल जाहीर करू ही घेतलेली भूमिका म्हणजे निव्वळ मराठा समाजातील विद्यार्थ्यांची फसवणुक आहे असा संघटनेचा आरोप आहे. जर एखादा व्यक्ती परीक्षा झाल्यानंतर कोर्टात गेल्यास विरोधात निकाल येऊ शकतो. जर वयाच्या संदर्भात दुमत असेल तर एक वर्ष वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी केलेली आहे.