1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (16:12 IST)

MPSC: कारभार सुधारण्याऐवजी मुलांची तोंडं बंद करण्याचा अट्टहास का?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC हे शब्द उच्चारले की हल्ली सगळ्यांना बोलायचं असतं. ज्यांचा परीक्षेशी सुतराम संबंध नाही त्यांनाही, जे परीक्षा देतात त्यांनाही आणि ज्यांना काही बोलायला दुसरा विषय नाही त्यांनाही. कारण बोलणं हे कृतीपेक्षा कधीही सोपं असतं.
नुकतंच MPSC ने एक परिपत्रक काढलं आहे. त्यात आयोगाने असं म्हटलं आहे की गेल्या काही दिवसांत आयोगाबद्दल बरंच अद्वातद्वा बोललं जात आहे. अत्यंत अश्लाघ्य भाषेत आयोगावर टीका करण्यात येत आहे.
विविध समाजमाध्यमांतून, प्रसारमाध्यमातून ही टीका केली जाते. आता अशी टीका करणाऱ्यांवर लक्ष ठेवलं जाईल आणि गंभीर काही आढळल्यास परीक्षा देण्यास बंदी घालण्यात येईल.
कोरोना काळ सुरू झाल्यापासून आयोगावर सातत्याने टीकेचा भडीमार होतोय. परीक्षा आयोजनातला ढिसाळपणा, निकाल लागला तर नियुक्ती पत्र देण्यातला अक्षम्य गोंधळ, अशा विविध कारणांनी आयोगावर टीका होत आहे.
आता परवाच 2021 साली होणाऱ्या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टिकेचा मारा सहन करण्याआधी आयोगाने आजचं हे परिपत्रक काढलं आहे.
आयोगाने आज जारी केलेल्या निवेदनात तमाम विद्यार्थ्यांचा उल्लेख 'भावी लोकसेवक' असा करण्यात आला आहे. त्यामुळे एक माजी परीक्षार्थी म्हणून मला बरं वाटलं. पण त्यात प्रश्न असा आहे की मग सातत्याने परीक्षेतला गोंधळ, अनागोंदी कारभारामुळे लाखो विद्यार्थ्याचे भवितव्य टांगणीला लागतं.
कोरोनामुळे आधीच नोकऱ्या कमी आहेत त्यामुळे विद्यार्थी सरकारी नोकरीकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत सातत्याने गोंधळ होत असेल तर विद्यार्थ्यांनी टीका का करू नये?
कोरोनाचं कारण दाखवत ऐनवेळेला परीक्षा रद्द केली. तेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरले. शेवटी सरकारने माघार घेतली.
गेल्या काही महिन्यांपूर्वी स्वप्नील लोणकर या विद्यार्थाने आयोगाच्या या कारभाराला कंटाळून आत्महत्या केली. आता काही दिवसांपूर्वी त्याचं नाव मुलाखतीच्या यादीत दिसलं. म्हणजे एका मृत विद्यार्थ्याचे नाव काढण्याइतकंही आयोग सौजन्य दाखवू शकत नाही मग विद्यार्थ्यांनी टीका केली तर त्यांचं काय चुकलं?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. लोकशाहीत अशा संस्थेचे अमाप महत्त्व आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
त्यात आयोग टिकेपासून असा दूर पळत असेल तर त्यात विद्यार्थ्याची काय चूक? आयुष्यातला महत्त्वाचा काळ या संस्थेवर विसंबून राहून जर काही लाख विद्यार्थी आपलं भविष्य आजमावू पाहत असेल तर त्यांना योग्य न्याय देणं हे आयोगाचं कर्तव्य आहे. असं परिपत्रक काढण्यापेक्षा कदाचित आपला कारभार सुधारण्याकडे आयोगाने आणखी लक्ष द्यावं.
 
विद्यार्थ्यांचंही चुकतंच...
हल्ली समाजमाध्यमांमुळे आपण जे चारचौघात जे बोलू शकत नाही ते बोलण्याची एक मोठी सोय निर्माण झाली आहे. त्याचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनीही घेतला आहे.
परीक्षेचा भरमसाठ अभ्यास करून थकलेले हे भावी लोकसेवक व्हॉट्स अप ग्रुप, टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर या माध्यमांचा आधार घेतात.
आयोगावर विनोद, मीम्स, टीका करणाऱ्या पोस्ट, जरा खुट्ट झालं की मोठ्या पोस्टींचा भडिमार करतात. मग लोकंही त्यावर हिरिरीने प्रतिक्रिया देतात आणि आयोगाला व्हिलन ठरवण्यात काहीही कसूर सोडत नाही. त्यामुळे आयोगाचा कारभार सुधारतो की नाही हा वेगळा भाग आहे पण विद्यार्थी टिकेचे धनी होतात.
MPSC देणारा विद्यार्थी म्हणजे ओवाळून टाकला आहे अशी समाजात आधीच एक धारणा आहे. त्यात अशा प्रकारचे टीकात्मक साहित्य या हेटाळणीत आणखी भर घालतात.
या सगळ्यात आणखी गोंधळ होतो, विद्यार्थ्यांचं अभ्यासावरचं लक्ष उडतं आणि मीम्स फॉर्वर्ड करण्यात त्यांचा वेळ जातो. या सगळ्या प्रवृत्तींना चाप लावण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो.
MPSCचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या ही लाखांच्या घरात आहे. आजी-माजी परीक्षार्थी, त्यांचे कुटुंबीय मिळून हा आकडा अनेक लाखांमध्ये जाईल. या वोट बँकेला दुखावणं शासनाला परवडणारं नाही. त्यामुळे काम सुधारता नाही आलं तरी किमान बदनामी तरी थांबवावी, यासाठी तर हा केविलवाणा प्रयत्न केला नसेल ना?
ज्याला काहीच जमलं नाही तो MPSC करतो असं एक चित्र गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालं आहे. त्याला सोशल मीडियावरच्या विचारवंतांचा हातभार लागला आहे. पण हे खरं नाहीये.
अनेक विद्यार्थी दिवसरात्र या परीक्षांचा अभ्यास करत असतात. घरची बेताची परिस्थिती असताना पोटाला चिमटा काढून जिवाचं रान करतात. त्यात वेळेवर परीक्षा झाली नाही किंवा गोंधळ झाला अन् त्याने रागाच्या भरात काही म्हटलं तर मायबाप MPSCने त्याला समजून का घेऊ नये?
वाईट भाषा वापरणं चुकीचंच आहे, पण आणि कुठपर्यंत भाषा चांगली आणि कुठपासून वाईट हे कोण ठरवणार?
विद्यार्थीदशेत असतानाही बोलायचं नाही आणि शासनसेवेत गेल्यावर तर बोलायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यावाचून आता विद्यार्थ्यांना पर्याय उरलेला नाही. मात्र मनावर आणि जिभेवर ताबा ठेवून शांतपणे अभ्यास करण्यापलिकडे आता विद्यार्थ्यांसमोर पर्याय नाहीये.
विद्यार्थ्यांनी आता सावध रहावे कारण आयोगाची करडी नजर तुमच्यावर आहे.