गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (13:10 IST)

मुंबई पाऊस : गोवंडीत घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, 11 जण जखमी

मुंबईतील गोवंडी परिसरात घर कोसळल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे, तर 11 जण जखमी झाले आहेत. गोवंडीतील शिवाजी नगर भागातील बॉम्बे सिटी हॉस्पिटलच्या जवळ हे घर होतं. तळमजला आणि पहिला मजला असं या घराचं स्वरूप होतं. पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
 
या घटनेची माहिती मिळताच बचावपथकं घटनास्थळी दाखल झाली. रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका, जेसीबी, डम्पर अशा सर्व गोष्टींसह बचावपथक दाखल झालं होतं. मृत्यमुखी पडलेल्यांपैकी नेहा परवेझ शेख (वय 35 वर्षे) आणि मोकर झबिर शेख (वय 80 वर्षे) अशी दोघांची नावं आहेत. जखमींना राजावाडी आणि सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
 
मुंबईत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
मुंबईत आज (23 जुलै) काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेनं दिलेल्य माहितीनुसार, 23 जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच, मुंबईत काही ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास आणि काही ठिकाणी 70 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय.
 
गेल्या आठवड्यात 30 मुंबईकरांचा पावसाने घेतला जीव
गेल्या आठवड्यातच मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी अशा दोन भागांमध्ये दुर्घटना घडल्या होत्या आणि त्यात 30 जणांचा मृत्यू झाला.
 
चेंबूरमध्ये मुसळधार पावसामुळे झाड भिंतीवर कोसळून झालेल्या अपघातात 19 जणांचा, तर विक्रोळीत संततधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला होता. विक्रोळीमधील सूर्या नगर, पंचशीळ चाळ भागात ही दुर्घटना घडली आहे.