बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 6 जुलै 2021 (23:51 IST)

मुंबई काँग्रेसला धक्का; कृपाशंकर सिंह उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह उद्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महापालिकेतील सर्व समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसचे मुंबईतील माजी नेते तसेच राज्य सरकारमधील माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी १२ वाजता भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. कृपाशंकर सिंह हे गेल्या बऱ्याच काळापासून पक्षीय राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. दरम्यान, उद्या ते भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. मुंबई काँग्रेसमधील उत्तर भारतीय नेत्यांपैकी ते एक नेते आहेत.
बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह मधल्या काळात अडचणीत आले होते. तेव्हापासूनच ते सक्रिय राजकारणातून अडगळीत गेले होते. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेले कृपाशंकर सिंह यांनी जम्मू-काशमीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याला पक्षाने विरोध केल्याचे निमित्त साधून २०१९ मध्ये काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र तेव्हापासून ते कुठल्याही पक्षाशी संलग्न नव्हते. मात्र ते लवकरच भाजपाच प्रवेश करतील असे सांगण्यात येत होते. देवेंद्र फडणवीस यांनीही कृपाशंकर सिंह हे लवकरच भाजपात प्रवेश करतील, असे संकेत दिले होते. मुंबईत सुमारे ४० ते ५० लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. म्हणजे उत्तर भारतीयांच्या मतांची टक्केवारी २० ते २५ टक्के आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात उत्तर भारतीयांची मते निर्णायकही आहेत. या उत्तर भारतीय मतदारांमध्ये कृपाशंकर सिंह यांची लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्याचा भाजपला फायदाच होणार असून काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कृपाशंकर सिंह हे मुंबईतील कालिना विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. तसेच त्यांनी काही काळ राज्याचे गृहराज्यमंत्रिपदही सांभाळले होते. त्याबरोबरच कृपाशंकर सिंह यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदही सांभाळले होते.