पावसाचा तडाख्याने विस्कळीत झालेले मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रात्रभर पावसाची रिपरिप असल्याने रेल्वे वाहतूक अद्यापही पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. मात्र पाण्याचा निचरा होऊ लागल्याने आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरु झाली असून मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दोन विशेष लोकल चालवल्या आहेत. दुसरीकडे मुंबईत डबे पोचवण्याची सेवा आज बंद ठेवण्यात आली आहे.
रेल्वे गाड्यांचा प्रवास देखील रखडत रखडत सुरु आहे. 7 वाजून 26 मिनिटांनी पहिली विशेष लोकल कल्याणच्या दिशेने सोडण्यात आली. रात्रभर कार्यालयात मुक्काम केलेल्या नागरिकांनी लोकलने प्रवास करण्यासाठी गर्दी केली. सीएसटी ते ठाणे दरम्यान 'बेस्ट'ने विशेष बससेवा सुरु केली आहे.
मंगळवारची रात्र अनेकांना कार्यालयात, मित्राच्या, नातेवाईकांच्या घरी, रेल्वे स्थानकावर काढावी लागली. रात्री उशिरापर्यंत लोकलमध्ये अडकलेल्या गर्भवती महिला, अपंग व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जीआरपीचे कर्मचारी कार्यरत होते. कुर्ला ते शीव स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलेले असल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीचा बोजवारा उडालेला आहे. मुंबई व परिसरातील शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर न येण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे.