बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 25 सप्टेंबर 2022 (10:48 IST)

समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर-गोवा एक्स्प्रेस वे -देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
'नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर-गोवा एक्सप्रेस वे बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा 'इकॉनॉमिकल कॉरिडॉर' विकसित करण्यात येणार आहे' अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
 
नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ (नरेडको) या संस्थेतर्फे हॉटेल ली-मेरिडियन येथे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. 
 
"नागपूर हे शहर लॉजिस्टिक हब म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक सपोर्ट तयार होणार आहे. भारतातील प्रत्येक मोठ्या शहराला आठ ते दहा तासात नागपूर जोडले जाणार आहे. त्यामुळे या शहरात बांधकाम व्यावसायिक व विकासक यांना फार मोठी संधी आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा इकॉनोमिकल कॉरिडॉर म्हणून विकसित होत आहे. यापाठोपाठ विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ते गोवा हा नवा इकॉनोमिकल कॉरिडॉर तयार होत आहे. याशिवाय नागपूर-दिल्ली आणि नागपूर-हैदराबाद महामार्ग विकसित होणार आहे. त्यामुळे विदर्भात लवकरच नवे नागपूर, नवे वर्धा, नवे अमरावती अशी विस्तारित शहरे आकारास येतील".