मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑगस्ट 2025 (20:19 IST)

नागपूर पोलिसांनी एआयच्या मदतीने 36 तासांत 'हिट अँड रन' प्रकरणातील आरोपीला केली अटक

Nagpur Police AI
नागपूरमध्ये पोलिसांनी एआयच्या मदतीने 36 तासांच्या आत हिट अँड रन प्रकरण सोडवले. एआयच्या मदतीने पोलिसांनी गुन्हेगार ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतले. 
हे प्रकरण 9 ऑगस्ट रोजीचे आहे. नागपुरात एका ट्रक ने दुचाकीवरून जाणाऱ्याला धडक दिली आणि फरार झाला. या अपघातात मागे बसलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पतीला किरकोळ दुखापत झाली. पतीने जखमी पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी रस्त्यावरून जाणार्या लोकांकडून मदत मागितली. पण दुर्देवाने कोणीही त्याला मदत केली नाही. नंतर पतीने पत्नीचा मृतदेह दुचाकीच्या मागच्या सीटवर बांधून मध्यप्रदेशातील त्याच्या गावी निघाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 
पोलिसांनी जखमी पतीची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की ट्रकवर लाल रंगाचे डाग होते, परंतु तो ट्रकच्या आकाराबद्दल किंवा कंपनीबद्दल जास्त माहिती देऊ शकला नाही. इतक्या कमी माहितीसह गुन्हेगाराचा शोध घेणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान होते.
 
नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले की, कमी माहिती असूनही पोलिसांनी हार मानली नाही आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाभोवती असलेल्या तीन वेगवेगळ्या टोल नाक्यांमधून सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. या फुटेजची तपासणी करण्यासाठी दोन विशेष एआय अल्गोरिदम वापरण्यात आले. हे अल्गोरिदम संगणक दृष्टी तंत्रज्ञानावर आधारित होते .
 
पहिल्या अल्गोरिथमने फुटेजमध्ये लाल रंगात चिन्हांकित केलेले सर्व ट्रक शोधण्यात यश मिळवले. त्यानंतर, दुसऱ्या अल्गोरिथमने अपघाताच्या वेळी कोणता ट्रक घटनास्थळी होता हे ओळखण्यासाठी या ट्रकच्या सरासरी वेगाचे विश्लेषण केले. या आधारे, पोलिसांनी अपघातस्थळापासून 700 किमी अंतरावर असलेल्या ग्वाल्हेर-कानपूर महामार्गावरून ट्रक आणि त्याच्या चालकाला अटक केली.
महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाची सोडवणूक करण्यासाठी वापरलेल्या AI प्रणालीचे नाव MARVEL (Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement) आहे. ही देशातील पहिली राज्यस्तरीय पोलिस AI प्रणाली आहे. डेटा विश्लेषण सुधारता यावे आणि बाह्य स्रोतांवरील अवलंबित्व कमी करता यावे यासाठी पोलिसिंग आणि इतर सरकारी कामांमध्ये AI चा वापर वाढवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
Edited By - Priya Dixit