मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (11:41 IST)

नारायण राणे दिल्लीला रवाना, जे. पी. नड्डांसोबत होणार बैठक

भाजपचे खासदार नारायण राणे नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डांसोबत दिल्लीत त्यांची बैठक होणार आहे.
 
केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार होण्याची शक्यता असून चर्चेत असलेल्या सर्वच नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावून घेण्यात आल्याचं समजतंय.
 
शिवसेना,काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपत स्थिरावलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
 
एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा न करता पळ काढत असल्याची टीका नारायण राणे यांनी सोमवारीही केली होती.सोबतच आघाडीतले अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
 
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांनी सातत्याने ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे.पण राज्याच्या राजकारणात त्यांना थेट मोठा प्रभाव पाडता आलेला नाही.भाजपने सुरुवातीला युतीसाठी त्यांना राज्यापासून स्वतंत्र ठेवलं आणि आताही भाजप त्यांना केंद्रापुरते मर्यादित ठेवत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.