गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2024 (09:04 IST)

नाशिक: एकाच कंपनीतील तिघांचा 2 दिवसांत हृदयविकाराने मृत्यू

heart attack vs cardiac arrest
नाशिक : सातपूर येथील एकाच कंपनीतील तीन कामगारांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने दोन दिवसांत मृत्यू झाल्याने कंपनीतील कामगार व अधिकारी वर्गामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
 
कंपनीच्या पेंटशॉप विभागातील कामगार प्रकाश बाळासाहेब जाधव (वय ४५, रा. अमृतधाम, पंचवटी) यांचे ह्रदयविकाराने घरीच गुरुवारी (ता.१८) सकाळी निधन झाले.
 
ते मायको कंपनीतील निवृत्त कामगार बाळासाहेब जाधव यांचे पुत्र व महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील कार्मिक व्यवस्थापन विभागातील कर्मचारी नीलेश जाधव यांचे बंधू होत.
 
तर शुक्रवारी (ता.१९) दुसऱ्या दिवशी बॉडीशॉप विभागातील कामगार भागचंद चिला खैरनार (वय ५७) यांचे निधन झाले. दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांना अचानक ह्रदयविकाराचा जोरदार झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
 
त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. खैरनार यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळगावी पाटणे (ता. मालेगाव) येथे झाला.
 
तिसरे कामगार दीपक अनिल तळेले (वय ३५, रा. कामठवाडे) यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागल्याने ते मित्रासोबत तातडीने त्रिमूर्ती चौकातील खासगी दवाखान्यामध्ये लिफ्टने जातानाच त्यांचाही ह्रदयविकाराचा जोरदार झटका आल्याने मृत्यू झाला.
 
त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी व चौथीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे. तळेले यांचा अंत्यविधी मोरवाडी येथील अमरधाममध्ये करण्यात आला. प्रसंगी कंपनीतील कामगारांनी मोठी गर्दी केली होती.