1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2023 (07:26 IST)

नाशिक: पूजा भोईरच्या ‘डीमॅट’मध्ये सव्वा तीन कोटी! फसवणूक प्रकरणी 4 दिवसांची कोठडी

jail
सोशल मीडियावर ‘रिल्स’ आणि मराठी मालिकांमधील प्रसिद्ध बाल कलाकार साईशा भोईर हिची आई पूजा विशांत भोईर हिला नाशिक आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली आहे.
 
शेअर बाजारातील आर्थिक गुंतवणूकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून तिने शहरातील अनेकांना सुमारे ३ कोटींचा गंडा घातला आहे. मुंबई, ठाण्यातही तिच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, नाशिक पोलिसांनी तिला ठाणे पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे.
 
तिच्या डीमॅट अकांऊटमध्ये ३ कोटी ३० लाख रुपये असल्याची माहिती तपासात समोर आली असून, आलिशान फ्लॅट, सोने आदी मालमत्तेची माहिती नाशिक शहर गुन्हेशाखेच्या तपासातून समोर आली आहे.
अतुल सोहनलाल शर्मा (वय ६६, रा. सिरीन मिडोज, गंगापूर रोड) यांनी तीन कोटी रुपयांच्या फसवणुकप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गेल्या एप्रिल अखेरीस पूजा विशांत भोईर (वय ३२), विशांत विश्‍वास भोईर (वय ३५, रा. कल्याण, ठाणे) यांच्याविरूद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
 
संशयित पूजाला ठाणे पोलिसांनी अटक केली होती, तर तिचा पती विशांत फरारी आहे. ‘अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंग’मध्ये आर्थिक गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तिने अनेकांना गंडा घातला आहे. मुंबईतील फसवणूकप्रकरणी पूजाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर, नाशिक पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
 
सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेतील उपनिरीक्षक रुपेश केदार यांचे पथक करीत आहे. या तपासात पूजाच्या बँक खात्यांमध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झालेले आहे.
 
तसेच, पूजाने अनेकांना फसविल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत असून, यात नाशिकसह मुंबईतील हायप्रोफाईल नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, पूजाने परताव्यासाठी दिलेले धनादेशही बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने पूजा भोईर हिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
“पूजा भोईरच्या मालेमत्ता जप्तीची कारवाई सुरु आहे. तिच्या डीमॅट खात्यावर तीन कोटी ३० लाख रुपये आढळून आले. तिच्याकडे २७ लाख सोने व आलिशान फ्लॅट आहे. तिच्याशी संबंधित मालमत्तांचा शोध सुरु असून, त्या लवकरच जप्त केल्या जातील. याबाबत तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी देण्यासाठी पुढे यावे.” असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor