1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (21:23 IST)

आशी झाली अमेरिकन, मिळाले तिला अमेरिकन पालक, नवीन दत्तक प्रणालीनंतर पहिलीच घटना

Nasik girl from Aadhaar Ashram adopted by an American couple
नाशिकमधील आधाराश्रमातील आशी या बालिकेला अमेरिकेच्या दाम्पत्याने दत्तक घेतले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात एका छोटेखानी सोहळ्यात या दाम्पत्याकडे आशीला सोपविण्यात आले. यावेळी सरकारी अधिकाऱ्यांसह आधाराश्रमातील कर्मचारीही यावेळी कुतुहलाने आशीकडे आणि तिच्या नवीन पालकांकडे पाहत होते.
 
महिला व बालविकास विभागाच्या मान्यताप्राप्त आधाराश्रमात अनाथ व निराधार बालकांच्या संगोपन व पुर्नवसनाचे कार्य करण्यात येते. केंद्रीय दत्तक ग्रहन संसाधन (सी.ए.आर.ए) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रेग्युलेशन 2022 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील आधाराश्रम संस्थेतील कुमारी आशी या बालिकेला जमशेदी या परदेशी दाम्पत्याने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या उपस्थितीत दत्तक घेतले आहे, अशी माहिती आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहुल जाधव यांनी दिली आहे.
 
 जिल्हाधिकारी यांच्या कक्षात कुमारी आशी हिला दत्तक बालिका संदर्भातील कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून डेविन जमशेदी व लायनी जमशेदी यांच्या स्वाधीन करण्यात आले. श्री व सौ जमशेदी हे कुटुंब युएसए येथील रहिवाशी असून या दाम्पत्यांस यापूर्वी एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी बालके आहेत. कुमारी आशी हिला जन्मत: एकच किडनी असून तिची जीभ टाळूला चिटकलेली असल्याने त्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
 
दत्तक नियमावलीनुसार असे बालक विशेष काळजी घोषित केले जात असून ते परदेशी पालकांना दत्तक म्हणून दिले जाते. त्यानुसार जमशेदी दाम्पत्याला जुळी बालके असतांना देखील त्यांनी विशेष काळजीचे बालक दत्तक घेण्याची ईच्छा व्यक्त केली होती. मागील 8 महिन्यांपासून ही प्रक्रिया सूरू होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुर्ण करण्यात आली. कुमारी आशी हिच्या रूपाने नवीन दत्तक प्रणाली सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच आंतरदेशीय दत्तक प्रक्रिया नाशिक जिल्ह्यातून पूर्ण झाली आहे. तसेच आजपर्यंत देशांतर्गत या स्वरूपाचे 4 आदेश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पारित करण्यात आले आहेत, अशी माहिती जाधव यांनी दिली आहे.
 
आशी हिला दत्तक देतेवेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भुषण काळे, आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहूल जाधव यांच्यासह दत्तक पालक डेविन जमशेदी व लायनी जमशेदी उपस्थित होते.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor