राष्ट्रवादीला आणखी ४ मंत्रीपदे मिळणार, भाजप-शिंदे गटाला किती? जाणून घ्या
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजितदादा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत एकूण 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे या मंत्र्यांना कोणतं खांत मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवार यांनी युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली.
अजित पवार यांच्या पाठींब्यामुळे युती सरकार मजबूत झालं असलं, तरी त्यांच्या एन्ट्रीने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी मागणी सुद्धा भाजप आणि शिंदे गटातील आमदारांकडून केली जात आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
युती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार असून यामध्ये १४ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटाला समान जागा मिळणार आहे, एका वृत्त संस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
वृत्तानुसार, तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्या गटाला ४ मंत्रिपदे मिळणार आहे. यामध्ये एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. तर भाजप आणि शिवसेना यांना प्रत्येकी ५ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हा विस्तार पार पडेल, असंही सांगण्यात आलं आहे.
युती सरकारमध्ये तिन्ही पक्षांना मिळून एकूण ४३ मंत्रिपदे मिळणार आहे. यामध्ये अजित पवार आणि शिंदे गटाला प्रत्येकी १४ तर भाजपला १५ मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत तिन्ही पक्षांच्या २९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता १४ मंत्रिपदेच शिल्लक असून यामध्ये कुणाची वर्णी लागणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor