गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 मे 2021 (15:37 IST)

हलगर्जीपणा भोवला ; मंडळ अधिकार्‍यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून निलंबनाची कारवाई

करोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामात हलगर्जीपणा करत कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुपा येथील मंडळ अधिकारी शिवाजी तुकाराम शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
 
जिल्हाधिकारी भोसले यांच्या निलंबनाच्या आदेशात पारनेर तहसीलमधील अव्वल कारकून आणि सुपा मंडलाधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार असणार्‍या शिंदे यांच्याकडे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लिक्विड ऑक्सिजन टँकरवर देखरेखीची जबाबदारी होती.
 
लिंडे एअर प्रोडक्टस्, तळोजा, (जि.रायगड) येथून मेडिकल ऑक्सिजन भरुन हा टॅकर विनाअडथळा नगर येथे पोहचविण्याची जबाबदारी शिंदे यांच्याकडे असतांनाही
त्यादिवशी सायंकाळी गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडून तळोजा येथे जाण्यासाठी वाहन ताब्यात घेवून पोलीस पथकासह ऑक्सिजन टॅकर सोबत जाणे अपेक्षित असताना शिंदे गेले नाहीत.
 
यामुळे जिल्हा रुग्णालय, रिफीलर प्लॅन्टवर ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर होऊ शकला नाही. शिंदे यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामात हलगर्जीपणा करुन कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यामुळे जिल्हाधिकारी भोसले यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
 
यासह करोना काळात कामात आणि नियुक्ती दिलेल्या कोविड सेंटरवर हजर न होणार्‍या पाच वैद्यकीय अधिकार्‍यांचे निलंबनाचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले आहेत.