शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (08:49 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नेटकरी संतापले!; कारण “हे” आहे

eknath shinde
गेल्या काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल होत होता. ज्यामध्ये एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये बसले होते. त्यावरुन सोशल मीडियाच नाही तर विरोधी पक्षांनी देखील या दोघांना चांगलेच धारेवर धरले होते. अखेर श्रीकांत शिंदेंना पत्रकार परिषद घेऊन या विषयाचा सोक्षमोक्ष लावायला लागला होता. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे अशाच काहीशा विषयावरून चर्चेत आले आहेत.
 
दोन दिवसांपूर्वी पालघरमधल्या काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाला आहे. याचे फोटो एकनाथ शिंदे यांनी स्वतः आपल्या ट्वीटरवरुन शेअर केले होते. या फोटोमध्ये या माणसांच्या मागे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असा बोर्ड दिसत आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री कार्यालयामध्ये झाला का? अशी शंका उपस्थित झाली आहे. जर हे खरे असेल तर पक्षाचे असे खासगी कार्यक्रम सरकारी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कशाला?
 
त्यामुळे नेटकऱ्यांनी देखील या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःच्या पक्षाचे कार्यालय नसल्याने असे करावे लागतेय, असे काही जणांचे म्हणणे आहे. तर काही जणांनी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पक्षाचे कार्यक्रम घेणे चूक आहे, असे मत मांडत या गोष्टीचा निषेध केला आहे. आता हा पक्षप्रवेश झाला ते नक्की मुख्यमंत्री कार्यालयच होते का? जर तसे असेल तर अशा पद्धतीने सरकारी कार्यालयामध्ये पक्षाचा कार्यक्रम घेणे योग्य आहे का? अशा जनतेच्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच उत्तर द्यावे म्हणजे या चर्चांना पूर्णविराम लागेल. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor