आता दर शुक्रवारी दुधाचे भाव ठरणार
आता सहकारी दूध संघांनी दुधाचा दर कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार शुक्रवारी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध कल्याणकारी कृती समितीची बैठक होणार असून त्यामध्येच दुधाचा दर निश्चित होणार आहे. राज्यात दररोज सुमारे १ कोटी २५ लाख लिटर दुधाचे उत्पादन होत असून त्यापैकी एकट्या मुंबईत ५० लाख लिटर दूध वितरित होते. सध्या राज्यात मुबलक दूध उपलब्ध असून ते १८ ते २४ रुपये लिटर दराने खरेदी केले जात आहे. दुधाचा खरेदी दर कमी असल्याने विक्री दर कमी करण्याचा निर्णय खासगी दूध संघांनी घेत प्रतिलिटर ४२ रुपयांवरून ३८ रुपये एवढा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सहकारी दूध संघही दुधाचे दर कमी करणार आहेत. त्याबाबत शुक्रवारी पुणे येथे बैठक होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य दूध कल्याणकारी समितीचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दिली.