शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (15:48 IST)

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय येत्या शुक्रवारी होणार : नाना पटोले

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली  सर्वपक्षीय बैठक झाली.या बैठकी नंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा  निर्णय शुक्रवारी होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं. 
 
दरम्यान, नाना पटोले यांनी बैठकीत काय झालं याची माहिती माध्यमांना दिली.ओबीसी आरक्षण कायम ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी सगळ्यांचं एकमत झालेलं आहे.त्यावर मार्ग कसा काढता येईल यावर चर्चा झालेली आहे.येत्या शुक्रवारी पुन्हा बैठक होणार आणि त्यावेळी अंतिम निर्णय घेतला जाणार अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
 
५० टक्क्यांच्यावर आपल्याला जाता येत नाही. ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण मिळणारच नाही, त्याही जिल्ह्यांमध्ये कसं आरक्षण मिळेल यासंदर्भात अभ्यास सुरु आहे.शुक्रवारी पुन्हा एकदा बैठक होणार आहे. जवळपास महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांमध्ये आरक्षण कायम राहणारच आहे.उर्वरित १६ जिल्ह्यांमध्ये कमी जास्त पणा होणार आहे.त्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये कसं देता येईल यावर चर्चा झाली, असं पटोले यांनी सांगितलं.राजकीय वाद बाजूला सारुन सर्वांनी ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सर्वांची भूमिका एक आहे. तशा पद्धतीचा निर्णय येत्या शुक्रवारी होण्याची शक्यता असल्याचं नाना पटोले म्हणाले.