रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (15:43 IST)

मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी अधिकारी फडणवीसांना भेटतात; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

कोणत्याही मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस,आयएएस अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात.हे नियोजित कटकारस्थान असून योग्यवेळी ते उघड करू,असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.मलिक यांच्या या गंभीर आरोपांमुळे एकच खळबळ उडाली असून भाजपने मात्र मलिक यांच्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
 
नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा आरोप केला आहे.काही आयपीएस,आयएएस अधिकारी मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात.हे नियोजित कटकारस्थान आहे, त्यांच्या भेटी आम्ही वेळोवेळी उघड करू.केंद्रीय नेते आणि फडणवीसांना भेटून हे अधिकारी आरोप करतात, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
 
काही अधिकारी या सरकारवर आरोप करत आहेत. त्यांच्या फडणवीसांसोबत आरोप करण्यापूर्वी बैठका झाल्या आहेत. ठरवून कटकारस्थान केलं जात आहे.वेळ आली तर त्याची माहितीही देऊ.कोणते अधिकारी आणि विरोधी पक्षनेते आरोप करण्यापूर्वी कुठे भेटले आणि कसे भेटले याची माहिती देऊ,असं ते म्हणाले.फडणवीस आणि केंद्रीय नेत्यांसोबत बैठका झाल्यानंतर आरोपांची मालिका सुरू झाली आहे,असा दावाही त्यांनी केला.देशातील संस्था आणि एजन्सी याचा राजकीय वापर होतो हे आता लपून राहिले नाही. ईडी आणि सीबीआयच्या कार्यपद्धतीवर आता कोर्टानेही प्रश्नही उपस्थित केले आहेत.ते जेवढे हैराण करतील तेवढी जनता आमच्यासोबत राहील, असंही त्यांनी सांगितलं.
 
भाजपचे केंद्रातील सरकार जिथे विरोधी पक्षाचं सरकार आहे. तिथे त्या सरकारला बदनाम करण्यासाठी,त्या सरकारमधील नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी कट कारस्थान रचत आहे.बंगालमध्ये तिच परिस्थिती करण्यात आली आहे.महाराष्ट्रात तसंच केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे.अनिल देशमुख,भावना गवळी, अनिल परब आणि संजय राऊत असतील या सर्वांना राजकीय हेतूने टार्गेट केलं जात आहे.कोणताही अधिकारी भ्रष्ट असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण सर्व विषय राजकीय हेतूने जोडण्यात येत आहे. हे सर्व कट कारस्थान भाजपने रचलं आहे, असंही ते म्हणाले.