गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (22:07 IST)

6 फेब्रुवारीला काँग्रेसकडून आंदोलन, एसबीआय व एलआयसीच्या कार्यालयांसमोर आंदोलन करणार

nana patole
‘अदानी’ समूहातील गैरकारभाराची चौकशी करावी व जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार ६ फेब्रुवारीला एसबीआय व एलआयसीच्या राज्यातील सर्व कार्यालयांसमोर आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी दिली.
 
संसदेत काँग्रेस पक्ष सामान्य जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी आवाज उठवत आहेच पण रस्त्यावर उतरुनही जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहे. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राज्यातील सर्व कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार, विविध सेलचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
 
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ट संबंध जगजाहीर आहेत. या संबंधातूनच सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांनी जनतेच्या कष्टाचा पैसा अदानीच्या उद्योग समुहात कसलाही विचार न करता गुंतवला आहे. विमानतळ, रेल्वे, वीजसेवा, रस्ते, बंदरे यासह देशातील सर्व महत्वाचे सरकारी उद्योग अदानींच्या घशात घातले आहेत. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक व सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी मधील जनतेचा पैसाही अदानीच्या खिशात घातला आहे. अदानीच्या गैरकारभाराचा फुगा आता फुटला असून लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, हा पैसा जनतेचा आहे. एवढा मोठा घोटाळा होऊनही मोदी सरकार, पंतप्रधान आणि अर्थमंत्री गप्प आहेत हे अतिशय लाजीरवाणे व असंवेनशीलपणाचे लक्षण आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor