सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जुलै 2022 (21:27 IST)

प्रश्नपत्रिकेतील आक्षेपार्ह प्रश्नांबाबत मुक्त विद्यापीठाकडून गंभीर दखल

yashwant rao
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. (राज्यशास्त्र) तृतीय वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन आक्षेपार्ह प्रश्नांबाबत विद्यापीठाने गंभीर दखल घेतली असून, दोनही प्रश्न बाद ठरविण्यात येऊन या अभ्यासक्रमातील संबंधित आक्षेपार्ह घटकच रद्दबातल करण्याचा आणि निर्णय घेतला आहे. पेपर सेटरसह पेपरचे संपादक, समीक्षक (मॉडरेटर) यांची चौकशी करण्यात येऊन दोषींना निष्काषित करण्यात येणार असल्याचे प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.प्रकाश देशमुख यांनी जाहीर केले.
मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. (राज्यशास्त्र) तृतीय वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत ‘आधुनिक भारतातील राजकीय वारसा’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा’ आणि ‘मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्व स्पष्ट करा’ हे दोन प्रश्न होते. यावर काही सामाजिक संघटनांनी आक्षेप घेऊन निवेदन दिले होते. त्याबाबत काल कुलसचिव प्रा.डॉ. देशमुख यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची त्वरित बैठक बोलवून याबाबत चर्चा केली. बैठकीनंतर विद्यापीठाची याबाबतची भूमिका व निर्णय स्पष्ट करण्यात आला. दोनही आक्षेपार्ह प्रश्न बाद ठरविण्यात येऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य मूल्यमापन करण्यात येईल, असे ठरविण्यात आले. प्रामुख्याने या अभ्यासक्रमातील याबाबतचा आक्षेपार्ह घटक अभ्यासक्रमातून रद्दबातल ठरविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सुधारित पुस्तके संबंधित विषयाच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात उपलब्ध करून दिली जातील. सध्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेला हा आक्षेपार्ह घटक त्वरित काढून घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. सुधारित घटक ग्रंथनिर्मिती केंद्रामार्फत लवकरच अपलोड केला जाईल.
 
संबंधित आक्षेपार्ह प्रश्न काढणारे पेपर सेटर, संपादक, मॉडरेटर यांची माहिती घेऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. जबाबदारी निश्चित करण्यात येऊन दोषींना निष्काषित करण्याचेही आदेश देण्यात आले. या बैठकीला परीक्षा नियंत्रक बी.पी. पाटील, नियोजन अधिकारी डॉ. हेमंत राजगुरू, कुलसचिव प्रा.डॉ. देशमुख यांच्यासह मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे संचालक डॉ. प्रवीण घोडेस्वार, मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. सज्जन थूल उपस्थित होते.