आता शिवबंधन नाही तर थेट शिवबॉण्ड
आमदारांच्या अभूतपूर्व बंडानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात फूट पडली. नाराज शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात सहभागी होऊ लागले, खासदारांची नाराजी समोर येऊ लागली. आता संघटनात्मक फूट थोपवण्यासाठी शिवसेनेने आता पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.
स्वतः उध्दव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. आदित्य ठाकरे, संजय राऊत राज्यातील विवीध भागात जाऊन शिवसेना कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अडगळीत टाकण्यात आलेले अनंत गीते यांच्यासारखे जुने जाणते नेतेही पक्षाच्या मदतीसाठी धावून आले आहेत. कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करून संघटनेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले जात आहे. गद्दारांना धडा शिकवा अशी साद घातली जात आहे. तर दुसरीकडे कायदेशीर प्रश्न उपस्थित झाल्यास शिवसेना संघटना आपल्याच पाठीशी आहे. हे दाखविण्यासाठी शिवसेना नेतृत्वाने पाऊलं उचलली आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून १०० रुपयांच्या बॉंण्ड पेपरवर आपण शिवसेनेतच असल्याचे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे लिहून घेतले जात आहे. या शिवबॉण्डची शिवसेनेच्या गोटात चांगलीच चर्चा रंगते आहे. जिल्हाप्रमुखांवर हे शिवबॉण्ड लिहून घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे शंभर रुपयांच्या बाँण्ड पेपरची मागणी आणि खपही चांगलाच वाढला आहे.