राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला पाठिंबा देणं अनाकलनीय- बाळासाहेब थोरात
राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठीचा लढा आहे. स्त्री, पुरूष, आदिवासी, बिगर आदिवासी यामुद्द्यावरील हा लढा नाही. संविधानाचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे, पण तरीही शिवसेनेने भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला आपला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर आम्ही कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेत नाही, असंही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने शिवसेनेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
"शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्याचं कारण सांगितलं आहे, पण त्यामागची शिवसेनेची खरी भूमिका शिवसेनेलाच माहिती आहे. त्याबद्दल आम्ही काय सांगणार?" असं थोरात म्हणाले आहेत.
"ज्या भाजपने संविधानाचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार पाडलं त्या भाजपच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देत असेल तर काय बोलावं? भाजपने शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे आणि त्याच शिवसेनेने भाजपला पाठिंबा देणे हे अनाकलनीय आहे," असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.