बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (08:48 IST)

अफूच्या तस्काराच्या मुसक्या आवळल्या;९ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळ्यातील आर्वी शिवारातून तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे नऊ लाख 93 हजार 180 रुपये किमतीचा अफू जप्त केला आहे. या कारवाईत वाहनांसह तब्बल 17 लाख 93 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळ्यातील अमलीपदार्थ प्रतिबंधक ही दुसरी मोठी कारवाई असून धुळे अवैध धंद्यांचा अड्डा तर नाही बनत चाललाय न अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

धुळे शहरातील देवपूर भागात काही दिवसांपूर्वीच लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला होता, विट भट्टी परिसरातील एक इसम आपल्या एका पत्र्याच्या गोडाऊन मध्ये लाखो रुपयांचा गुटखा ठेऊन होता. संशयित सलमान खान याच्या घराजवळच्या शेडची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल तीन लाख रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला व गुटखा हा जप्त करण्यात आला आहे. ही घटना ताजी असतानाच नऊ लाखांचा अफू जप्त केला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आर्वी शिवारात काल रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना एका महिंद्रा कंपनीच्या गाडीतून अफूची वाहतूक केली जात होती हा मुद्देमाल मालेगाव कडे जात असल्याचे संशयास्पद रित्या पोलिसांना दिसून आल्यानंतर त्यांनी वाहन थांबवून तपासणी केली असता या वाहनात 18 गोण्यांमध्ये 331 किलो वजनाचा सुमारे नऊ लाख 93 हजार 180 रुपये किमतीचा मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा अफूच्या बोंडांचा चुरा भरलेला मिळून आला.
 
यावेळी पोलिसांनी वाहन रस्त्याच्या बाजूला लावण्यात सांगितल्यानंतर चालक पळून जाऊ लागला. मात्र त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले असून या कारवाईत सुमारे आठ लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीच्या गाडीसह नऊ लाख 93 हजार 180 रुपये किमतीचा अफू जप्त करण्यात आला आहे. यात वाहनासह एकूण 17 लाख 93 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor