बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (08:30 IST)

काँग्रेस नेत्यांचे पार्ट टाईम राजकारण : देवेंद्र फडणवीस

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला पार्ट टाईम पक्ष असे संबोधले आहे. काँग्रेस देशातील पार्ट टाईम पक्ष आहे. केवळ जुन्या पुण्याईवर पक्ष चालवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते केवळ पार्ट टाईम राजकारण करत आहेत असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावरही फडणवीसांनी टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीसांनी गोव्यातून काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाची स्थिती देशात कशी आहे ते तुम्ही पाहत आहात. देशात काँग्रेस हळूहळू नामशेष होत आहे. देशात काँग्रेस पक्ष आता पार्ट टाईम पक्ष झाला आहे. कारण काँग्रेसचे नेते पार्ट टाईम आहेत ते फुल टाईम काम करत नाहीत. त्यामुळे त्यांचा पक्षही पार्ट टाईम आहे तो फूल टाईम राजकारण करत नाहीत. तो पूर्णवेळ जनतेची सेवा करत नाही. चालवायचा म्हणून पक्ष चालला आहे. जुन्या पुण्याईवर पक्ष चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ती सुद्धा संपली असून जुने नेते राहिले नाहीत अशी काँग्रेसची अवस्था पाहायला मिळत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
गोव्यातील परिस्थिती पाहतो आहोत. गोव्यात वेगवेगळे पक्ष येत आहेत. गोव्याला प्रयोगाची भूमी केली आहे. आपल्या पक्षाचा प्रयोग गोव्यात करण्यात येत आहे. पण गोव्यातील लोक हुशार आणि समजदार आहेत. त्यांना समजत कोण आपल्यासोबत राहणार आहे आणि निवडणुकीनंतर कोण ऊडून जाणार आहे. त्यामुळे दिल्लीतील आणि पश्चिम बंगालमधील पक्ष फक्त निवडणुकीसाठी येतात गोव्यातील अडथळे तयार करतात राजकारण करतात आणि लोकांमध्ये फूट पाडतात, निवडणुकांमध्ये हारल्यावर पुन्हा ५ वर्षे तोंड दाखवत नाहीत मात्र निवडणुका लागल्यावर पुन्हा गोव्यात पाहायला मिळतात. अशा प्रकारे जे फक्त निवडणुकीसाठी येतात त्यांच्याकडे गोव्यासाठी कोणताही कार्यक्रम नाही आहे. निती नाही गोव्याच्या विकासाची नियत नाही. असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी आम आदमी पार्टी आणि टीएमसीवर केला आहे.