पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रातही झटका
पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रात महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सनं क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेण्यात येईल असं सांगतानाच देशमुख यांनी नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
बाबा रामदेव यांनी कोरोनावर यशस्वी औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपीठानं हे औषध तयार केलं असून मंगळवारी ते लाँच करण्यात आलं. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारनं या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता.
बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती, अशी माहिती समोर आली होती. हे औषध लाँच झाल्याच्या काही तासांतच केंद्रीय आयुष मंत्रालयानं त्याच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश जारी केले होते.
आता महाराष्ट्रातही या औषधाच्या विक्रीला परवानगी नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.