गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मे 2023 (20:58 IST)

महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी जे ठरवले त्यानुसार खालच्या लोकांना काम करायचं आहे-छगन भुजबळ

chagan bhujbal
राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक निवडणुकीतील प्रचारादरम्यान केला होता. यावरून महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे जोपर्यंत एकत्र आहे. तोपर्यंत बाकीचे कुणी काहीही बोलले तरी  तिकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी जे ठरवले त्यानुसार खालच्या लोकांना काम करायचं आहे. त्यामुळे मिठाचे खडे कुणी टाकू नये असा टोला भुजबळ यांनी लगावला. ते नाशिकमध्ये बोलत होते. 
 
चव्हाण यांच्या आरोपांवर बोलतांना भुजबळ म्हणाले, थोडंफार जे आहे, ते एका पक्षाचे दुसर्‍या पक्षाच्या विरोधात सुरू असतं. पण तीन वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्यानंतर थोडं घर्षण होतं. नेत्यांनी जर असे काही म्हटले, तर एकजुटीत विस्कळीतपणा निर्माण होईल. ते होता कामा नये. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण राहिलेले आहे. पंधरा वर्ष राज्य करत असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार त्यांच्या काळात गेलं. मला असं वाटतं की, या सगळ्यांनी आपल्या अंतर्मनात शोध घेतला पाहिजे की, हे असे कसे झाले? निदान आता परत एकदा जर बांधणी होत असेल, तर अशा पद्धतीचे वक्तव्य होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे असे म्हणत छगन भुजबळ यांनी 2014 ला गेलेल्या सरकारचा ठपका ठेवत एकसंघ राहण्याचा सल्ला दिला आहे.
 
पुण्यातील डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रकरणी बोलतांना ते म्हणाले, असे आहे की, बाकी काही जरी असले, तरी आरएसएस संघटनेवर कुणी देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही, करता कामा नये. परंतु आरएसएस मध्ये आहे असे सांगून जर कुणी असे धंदे करत असेल, तर आरएसएसने त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे. पोलीस आणि तपास यंत्रणेने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. राष्ट्राला धोका देणारे कुठल्याही पक्षाचे असतील, त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.


Edited By- Ratnadeep Ranshoor